पुण्यानंतर जर आम्हाला कोणती जागा आवडत असेल तर ती म्हणजे गिरगांव. पुण्याच्या लोकांचा उर्मटपणा खासा ह्यांच्यात उतरलेला. अगदी सदाशिव वगैरे म्हणून मिरवण्यासारखे भागसुद्धा सापडतील ह्या गिरगावात. त्या दादराला आणि पार्ल्याला नाही सर त्याची. कदाचित डोंबिवलीला असेल.
असो, सांगायचा मुद्दा हा की मराठी माणूस म्हणून आमचा स्वाभिमान (आम्हाला हा आहे हेच आम्हाला नुकतंच कळलंय) जागृत वगैरे झालेला असताना, गिरगावासारख्या मराठी माणसांच्या अड्ड्यात जायचा योग आला. अगदी सिंहगड चढून गेल्यावर अभिमानाने छाती वगैरे फुगून येते तसंच काहीसं आमचं मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरल्यावर झालं. ओ, विचार करू नका, शुद्ध मराठीत त्या जागेला अजूनही मुंबई व्ही. टी. असं म्हणतात. असो तर सकाळची वेळ होती डेक्कन क्वीन पोचलेली. अरेरे, चुकलोच. दख्खनची राणी म्हणायला हवं खरंतर. त्वरेने आम्ही मराठी माणसं शोधायला लागलो. आजूबाजूला बरीच मराठी मंडळी दिसत होती. मराठी आंदोलनानंतर मुंबईतले भय्ये पळून जाऊन मराठी माणसांची तुलनात्मक संख्या वाढल्याचं पाहून आम्हाला भरून आलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आजूबाजूची मराठी गर्दी ही माझ्याबरोबरच दख्खनच्या राणीतून (पक्षी डेक्कन क्वीन) उतरलेली असल्याचं चौकशीअंती कळलं आणि आमचा हिरमोड झाला.
बाहेर भाडीणीच्या (पक्षी टॅक्सी. खुलासा केलेला बरा) रांगेत उभा राहिलो. पुण्याचा वगैरे असल्याने जाज्वल्य वगैरे अभिमान असल्यासारखं वाटतंच होतं. फक्त नक्की कसला अभिमान वाटतोय हे कळत नव्हतं. पण बहुदा तो मराठीचा असावा असं गेल्या काही दिवसातल्या घटनांमुळे वाटतंच होतं. त्यामुळे फक्त मराठी चालकाच्या भाडीणीनेच गिरगावात जायचं ठरवलं. पण सगळेच भाडीणीचालक भय्ये. त्यामुळे पंचाईत झाली. पण आमची प्रतिज्ञा म्हणजे अगदी भीष्मपितामहासारखी. त्यामुळे जिथे नक्की मराठी चालक व वाहक (पक्षी कंडूक्कर) मिळतील अशा उत्तम (पक्षी बेस्ट) गाडीने आम्ही गिरगावचा रस्ता धरला. बसवरचा सहासष्ट हा आकडा मराठीत लिहिलेला पाहून आम्हाला पुन्हा एकदा भरून आलं.
पोचेपोचेपर्यंत दुपार झालीच होती. भूकही लागली होती. म्हटलं अहाहा. आता मस्त पणशीकराकडे जाऊन काहीतरी मराठी पदार्थ खावेत. असं म्हणून आम्ही त्यांच्या उपाहारगृहात पोचलो. तुच्छ कटाक्षाने झालेलं स्वागत आणि तुसड्या भाषेत बोलणारे परिचारक (पक्षी वेटर) ह्यामुळे आम्ही मराठी मुलखाच्या केंद्रस्थानीच पोचल्याची ग्वाही मिळाली. पण तरीही आजूबाजूला कुणी मराठी दिसेना. आजूबाजूने आपले सगळे "केटला माटे? खा बटाटे" मराठी अस्मिता वगैरे कुठे दिसेना. चटकन पणशीकरांनी अहमदाबादेत तर आपलं दुकान उघडलं नाही ना? असं वाटून गेलं. पण तेवढ्यात मला मराठी अस्मिता भेटली. आमच्याच कचेरीतली अस्मिता यजमानांबरोबर दुकानात प्रवेशकर्ती झाली. म्हटलं बरं आहे, पुण्याला जाऊन सांगता येईल, मराठी अस्मिता गिरगावात एकदम मजेत आहे.
असो. कितीही जाज्वल्य अभिमान वाटत असला तरी दुपारची वामकुक्षी ही हवीच. ती घेऊन आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. तर पुन्हा एकदा समस्त गुजरात स्टेशनाकडे धावत असलेला दिसला. त्यांचा मारा चुकवत आम्ही एका वडापाव वाल्याकडे पोचलो. तो दक्षिण भारतीय निघाला. त्याच्या बाजूचा ताक विक्रेता उत्तर भारतीय निघाला. भेळवाला ही त्याचाच भाऊ निघाला. केळेवालाही परप्रांतीय. फारच बिकट परिस्थिती झाली. मराठी बाण्यामुळे फक्त मराठी दुकानदारांकडूनच वस्तू घ्यायच्या हा आमचा खाक्या.
पुन्हा पणशीकरांकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी हिय्या करून आम्ही एका उडिपी उपाहारगृहात शिरलो. परिचारक मराठी नव्हता पण त्यानेही आमचे तुसडेपणाने स्वागत केले, हे पाहून मराठी माणूस जरी गिरगावात दिसत नसला तरी मराठी संस्कृती जिवंत असल्याची आम्हाला खात्री पटली. त्या उत्साहातच आम्ही इडली वडा खाऊन बाहेर पडलो.
पोट भरल्याने सगळं कसं छान वाटत होतं. अभिमान वगैरे ढगात पळाला होता.
उरलेली संध्याकाळ आम्ही मराठी माणसं शोधण्यात न घालवता मराठी माणसाचं स्मारक कुठे दिसतंय का हे शोधण्यात घालवला.
उगाचच वाटत राहिलं की रामदास फुटाण्यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्यातरी भय्या वडेवाल्याच्या गाडीसमोर ते स्मारक उभं असेल आणि खाली लिहिलं असेल.
"मुंबईका आखरी मराठा यहॉ वडापाव खाते खाते शहीद हो गया"
- बांबुराव
Tuesday, November 11, 2008
Subscribe to:
Comments (Atom)