Tuesday, November 11, 2008

मराठा कितुका आळवावा

पुण्यानंतर जर आम्हाला कोणती जागा आवडत असेल तर ती म्हणजे गिरगांव. पुण्याच्या लोकांचा उर्मटपणा खासा ह्यांच्यात उतरलेला. अगदी सदाशिव वगैरे म्हणून मिरवण्यासारखे भागसुद्धा सापडतील ह्या गिरगावात. त्या दादराला आणि पार्ल्याला नाही सर त्याची. कदाचित डोंबिवलीला असेल.

असो, सांगायचा मुद्दा हा की मराठी माणूस म्हणून आमचा स्वाभिमान (आम्हाला हा आहे हेच आम्हाला नुकतंच कळलंय) जागृत वगैरे झालेला असताना, गिरगावासारख्या मराठी माणसांच्या अड्ड्यात जायचा योग आला. अगदी सिंहगड चढून गेल्यावर अभिमानाने छाती वगैरे फुगून येते तसंच काहीसं आमचं मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरल्यावर झालं. ओ, विचार करू नका, शुद्ध मराठीत त्या जागेला अजूनही मुंबई व्ही. टी. असं म्हणतात. असो तर सकाळची वेळ होती डेक्कन क्वीन पोचलेली. अरेरे, चुकलोच. दख्खनची राणी म्हणायला हवं खरंतर. त्वरेने आम्ही मराठी माणसं शोधायला लागलो. आजूबाजूला बरीच मराठी मंडळी दिसत होती. मराठी आंदोलनानंतर मुंबईतले भय्ये पळून जाऊन मराठी माणसांची तुलनात्मक संख्या वाढल्याचं पाहून आम्हाला भरून आलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आजूबाजूची मराठी गर्दी ही माझ्याबरोबरच दख्खनच्या राणीतून (पक्षी डेक्कन क्वीन) उतरलेली असल्याचं चौकशीअंती कळलं आणि आमचा हिरमोड झाला.

बाहेर भाडीणीच्या (पक्षी टॅक्सी. खुलासा केलेला बरा) रांगेत उभा राहिलो. पुण्याचा वगैरे असल्याने जाज्वल्य वगैरे अभिमान असल्यासारखं वाटतंच होतं. फक्त नक्की कसला अभिमान वाटतोय हे कळत नव्हतं. पण बहुदा तो मराठीचा असावा असं गेल्या काही दिवसातल्या घटनांमुळे वाटतंच होतं. त्यामुळे फक्त मराठी चालकाच्या भाडीणीनेच गिरगावात जायचं ठरवलं. पण सगळेच भाडीणीचालक भय्ये. त्यामुळे पंचाईत झाली. पण आमची प्रतिज्ञा म्हणजे अगदी भीष्मपितामहासारखी. त्यामुळे जिथे नक्की मराठी चालक व वाहक (पक्षी कंडूक्कर) मिळतील अशा उत्तम (पक्षी बेस्ट) गाडीने आम्ही गिरगावचा रस्ता धरला. बसवरचा सहासष्ट हा आकडा मराठीत लिहिलेला पाहून आम्हाला पुन्हा एकदा भरून आलं.

पोचेपोचेपर्यंत दुपार झालीच होती. भूकही लागली होती. म्हटलं अहाहा. आता मस्त पणशीकराकडे जाऊन काहीतरी मराठी पदार्थ खावेत. असं म्हणून आम्ही त्यांच्या उपाहारगृहात पोचलो. तुच्छ कटाक्षाने झालेलं स्वागत आणि तुसड्या भाषेत बोलणारे परिचारक (पक्षी वेटर) ह्यामुळे आम्ही मराठी मुलखाच्या केंद्रस्थानीच पोचल्याची ग्वाही मिळाली. पण तरीही आजूबाजूला कुणी मराठी दिसेना. आजूबाजूने आपले सगळे "केटला माटे? खा बटाटे" मराठी अस्मिता वगैरे कुठे दिसेना. चटकन पणशीकरांनी अहमदाबादेत तर आपलं दुकान उघडलं नाही ना? असं वाटून गेलं. पण तेवढ्यात मला मराठी अस्मिता भेटली. आमच्याच कचेरीतली अस्मिता यजमानांबरोबर दुकानात प्रवेशकर्ती झाली. म्हटलं बरं आहे, पुण्याला जाऊन सांगता येईल, मराठी अस्मिता गिरगावात एकदम मजेत आहे.

असो. कितीही जाज्वल्य अभिमान वाटत असला तरी दुपारची वामकुक्षी ही हवीच. ती घेऊन आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. तर पुन्हा एकदा समस्त गुजरात स्टेशनाकडे धावत असलेला दिसला. त्यांचा मारा चुकवत आम्ही एका वडापाव वाल्याकडे पोचलो. तो दक्षिण भारतीय निघाला. त्याच्या बाजूचा ताक विक्रेता उत्तर भारतीय निघाला. भेळवाला ही त्याचाच भाऊ निघाला. केळेवालाही परप्रांतीय. फारच बिकट परिस्थिती झाली. मराठी बाण्यामुळे फक्त मराठी दुकानदारांकडूनच वस्तू घ्यायच्या हा आमचा खाक्या.

पुन्हा पणशीकरांकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी हिय्या करून आम्ही एका उडिपी उपाहारगृहात शिरलो. परिचारक मराठी नव्हता पण त्यानेही आमचे तुसडेपणाने स्वागत केले, हे पाहून मराठी माणूस जरी गिरगावात दिसत नसला तरी मराठी संस्कृती जिवंत असल्याची आम्हाला खात्री पटली. त्या उत्साहातच आम्ही इडली वडा खाऊन बाहेर पडलो.

पोट भरल्याने सगळं कसं छान वाटत होतं. अभिमान वगैरे ढगात पळाला होता.

उरलेली संध्याकाळ आम्ही मराठी माणसं शोधण्यात न घालवता मराठी माणसाचं स्मारक कुठे दिसतंय का हे शोधण्यात घालवला.

उगाचच वाटत राहिलं की रामदास फुटाण्यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्यातरी भय्या वडेवाल्याच्या गाडीसमोर ते स्मारक उभं असेल आणि खाली लिहिलं असेल.

"मुंबईका आखरी मराठा यहॉ वडापाव खाते खाते शहीद हो गया"

- बांबुराव

Thursday, October 30, 2008

एका ज्योतिर्विदाची गोष्ट

भविष्य हा आमचा आवडता विषय आहे. आम्ही भविष्यवेत्ते किंवा होराभूषण किंवा ज्योतिर्विद किंवा तत्सम काहीही नाही. मात्र पुढची अनेक वर्षे ह्या जमातीला मरण नाही एवढं भविष्य मात्र आम्ही अचूक वर्तवू शकतो. ह्याचं कारण म्हणजे लोकांची पंगू मने. ज्यांना वास्तवाचा भार पेलत नाही त्यांना आणि त्यांनाच अशा भविष्यवेत्त्यांच्या कुबड्या लागतात असं आपलं आमचं म्हणणं. अर्थात हे आमचं म्हणणं म्हणजे आमच्या हिचं म्हणणं ह्याच्या विरुद्ध असणार हे ओघानं (किंवा योगानं) आलंच.

एकदा आमची बायको चिंतामग्न बसलेली होती. तिला आम्ही विचारलं तिच्या चिंतेचं कारण, तेव्हा ती म्हणाली की तिला उंदराची चिंता लागून राहिली आहे. हल्ली मी हापिसात फारसे काम नसल्याने मराठी ब्लॉग्ज पठणात माझा वेळ घालवीत असतो. त्यातून भविष्य ह्या विषयावरचे (विनोदी) लेखही वाचत असतो. त्या (अ)ज्ञानाच्या बळावर आम्ही तिला सांगितलं की तिची ही समस्या आम्ही चुटकीसरशी सोडवू शकतो. आम्ही थोडा भविष्याचा अभ्यास सुरू केला असल्याचं तिला ठोकून दिलं. मग तिला आम्ही तिची समस्या विचारली.

ती म्हणाली की घरात एक उंदीर आला आहे आणि तो महाचतुर आहे. ह्या खोलीतून त्या खोलीत पळत असतो. त्याच्या आकाराच्या मानाने त्याला झेपेल ते कुरतडत असतो आणि उंदीर मारण्याच्या औषधाला अजिबात तोंड लावीत नाही. उंदरांसाठी ठेवलेल्या पिंजऱ्यातल्या भज्याची चोरी करून पिंजऱ्यात न अडकताच तो पळून जातो वगैरे वगैरे. आमच्यासाठी भजी न करता आमची ही उंदरांसाठीही भजी करते हे ऐकून आम्हाला अतीव दुःख झालं. पण ते दुःख बाजूला सारून आम्ही तिची ही समस्या कधी सुटणार ह्या कोड्याचं उत्तर प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सोडवायचं ठरवलं.

तिला मी एक आकडा मनात धरायला सांगणारंच होतो, पण तितक्यात मला एक महत्त्वाची गोष्ट आठवली. पळत पळतंच आम्ही स्वैपाकघरात जाऊन कालनिर्णय पाहून आलो. आज अमावस्या नसल्याची खात्री केली. आमचे मित्र दगडूशेट चपटे हे ख्यातनाम ज्योतिषी असल्याचा आव आणत गावभर फिरत असतात. त्यांनीच एकदा आम्हाला सांगितलं होतं की अमावास्येला भविष्य सांगू नये म्हणून. आम्ही त्यांना त्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले की त्या कारणे महिन्यातून एकदा तरी आम्हाला सुट्टी मिळते कामापासून. खरंतर महिनाभरही चपट्यांना काही काम नसतं हे आम्हाला माहीत होतं पण उगाचच त्यांची समाधानाची समाधी कशाला मोडा म्हणून आपलं आम्ही हो म्हटलं. पण आमच्या हिच्यासमोर भविष्यवेत्त्याचं नाटक वठवायचं म्हणून आम्ही आपलं हे अमावास्येचं पाहून घेतलं.

आता आम्ही तिला एक आकडा धरायला सांगितला. माझ्या पत्नीसमोर मीच उभा असल्याने तिच्या मनात बहुतेक ४२० हा आकडा आला. तो तिने आम्हाला सांगितला. वर ह्या आकड्याचा उंदीर घरातून जाण्याशी काय संबंध? असाही एक गूगली टाकला. आमची जवळ जवळ फे फे च उडणार होती. पण दगडूशेटांचं नाव घेऊन आम्ही तिला तिच्या मनात आलेला क्रमांक आणि आताची ग्रहस्थिती, उंदराची कुंडली, आमच्या घराची कुंडली आणि तिची कुंडली ह्याच्याशी कसा (बादरायण) संबंध आहे ते पटवून दिलं आणि कॉम्प्युटरवर जाऊन बसलो. चपट्यांच्या जालपानावर (म्हणजे वेबपेज) जाऊन काही आकृत्या बघितल्या तशाच रेखाटून तासाभराने बाहेर आलो.

आमची ही तिच्या प्रियसखीशी बोलताना दिसली. आम्ही प्रश्नकुंडली मांडून उंदराची समस्या सोडवत असल्याचं प्रियसखीला केव्हाच कळलं होतं. आमच्या ह्या उद्यमशीलतेचं यथास्थित कौतुक झाल्यावर त्या दोघींनी प्रश्नकुंडलीचं उत्तर विचारलं. आम्ही आम्हाला माहीत असल्या नसल्या ग्रहांची नावं घेऊन, त्यात राहू केतू ही अजून दोन नावं टाकून ठोकून दिलं की गुरुवारी उंदीर नाहीसा होईल. भविष्यकथन संपल्यावर गुरुदेवदत्त असं म्हणून वर पाहायलाही मी विसरलो नाही. दगडूशेट चपटेही भविष्यकथन केल्यावर असंच करतात हे आम्ही पाहिलं होतं.

पुढच्या तीन दिवसात आमच्या ह्या भविष्यकथनाची चर्चा घराघरातून व्हायला लागली. काही हुशार मंडळींना खात्री होती की बांबूराव नेहमीच्या पद्धतीने काहीतरी गेम खेळत आहेत पण बऱ्याचशा लोकांचा विश्वासही बसला. येता येता गुरुवार आला. आमची पत्नी कचेरीत गेली. आम्ही गुरुवार असल्याने घरीच होतो. उंदीर काही घरातून जायचे नाव घेईना. आम्हालाही मधून अधून तो फिरताना दिसे. आमची चोरी पकडली जाणार हे स्पष्ट दिसायला लागलं.

आम्ही गुरुवर्य दगडूशेटांचं स्मरण केलं आणि आम्हाला एक कल्पना सुचली. उंदीर ज्या कोपऱ्यात लपून बसला होता, त्या कोपऱ्यात आम्ही बेगॉन स्प्रे चा मारा सुरू केला त्यावर तो पळून दुसरीकडे जाऊ लागला. आम्ही हातात झाडू घेऊन सज्जच होतो. पळपुट्या उंदराच्या बरोबर घाव वर्मी लागला. अजून दोन तीन वेळा झाडू मारल्यावर तो बेशुद्ध झाला आणि (बहुदा) मेला.

आम्ही त्याला तसाच उचलून पिंजऱ्यात टाकला. त्यातलं भजं काढून पिंजरा बंद केला. ते भजं खायचा मोह बाजूला सारून आम्ही दगडूशेटांच चांगभलं म्हणत वर्तमानपत्र वाचत बसलो. संध्याकाळी आमची ही आणि तिची प्रियसखी कचेरीतून घरी आल्या. चहा करायला म्हणून दोघी स्वैपाकघरात गेल्या तोच एक आनंदी चित्कार ऐकू आला.

आमचं भविष्य खरं ठरलं. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी गावभर पसरली. आमच्यावर विश्वास नसलेल्यांचाही आमच्यावर विश्वास बसला. फोन येऊ लागले आणि प्रश्नही विचारले जाऊ लागले. आणि आम्ही आमच्या गावाचे प्रश्नकुंडली तज्ज्ञ झालो. धंदा सध्या जोरात चालू आहे. प्रश्न येत आहेत आम्ही कुंडल्या मांडतो आहोत आणि मोघम उत्तरे देत आहोत. चपट्यांप्रमाणेच एखादं जालपान सुरू करावं असाही विचार आहे. म्हणजे त्यांच्यासारख्याच थापा तिथे मारता येतील आणि आमचा जातकवर्ग वाढत जाईल.

गुरुदेव दत्त! दगडू चपट्याय नमः!!

- बांबुराव

Tuesday, October 21, 2008

अध्यात्माला आलंय भरतं

परवा आम्ही चक्क देवळात गेलो.

आता देवाची आणि आमची काही तशी खुन्नस नाही, पण एकदा देवळात गेलो की आमचं लक्ष परमेश्वराकडे सोडून आजूबाजूच्या नश्वर गोष्टींकडे जास्त जातं, म्हणून आम्ही सहसा देवळात जाण्याचं टाळतो. पण तरीही काही अपरिहार्य कारणामुळं आम्हाला जावं लागलंच. अपरिहार्य कारण हा शब्द "न सांगता येण्यासारखे" ह्या सदरात मोडणाऱ्या कारणांसाठी वापरतात. आम्ही सांगितलंही असतं की बायकोला गाडी चालवता येत नसल्याने आम्हाला सारथ्य करण्यासाठी म्हणून देवळात जायला लागलं, पण तसं म्हटलं तर दोन समस्या आहेत.

एक आमच्या बायकोचा असा समज आहे की तिला खूप छान गाडी चालवता येते, तिने जर का हे वाचलं तर आम्हाला घरी बांबू बसणार आणि दुसरी समस्या अशी की आमची बायको आम्हाला ड्रायव्हरसारखं वागवते अशी चर्चा ब्लॉग विश्वातल्या घरा घरात चालणार, म्हणून आम्ही ते सत्य मनातच ठेवून पुढचं लिहितो.

तर आम्ही पोहोचलो साईबाबांच्या देवळात. आम्हाला ते लांब काळे केसवाले जादुई आंध्रा साई झेपतंच नाहीत, त्यामुळे आम्ही शिरडीच्या साईबाबांच्या देवळात पोचलो. ही जागा मोठी मजेशीर आहे. पूर्वी इथे एक चर्च होतं, आता साई मंदिर आहे. पण आम्ही सबका मालिक एक (पैसा) जमातीतले असल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे ती जागा मजेशीर असण्याशी त्या जागेचा काहीच संबंध नाही. तिथल्या लोकांचा मात्र आहे.

एकंदरीतच साईमंदीरांत देवेभोळे लोकं अधिक असतात असा आमचा समज आहे. म्हणजे आत शिरलात की किमान दहा लोकं जमिनीवर आडवे होऊन साष्टांग नमस्कार घालताना दिसतात. त्यांच्या नमस्कारात नुसतीच आठ अंग नाही तर जी जी काही अंग जमिनीला लागू शकतील ती लागलेली असतात. असोत बापडी आमचा काही त्यावर आक्षेप नाही.

किमान दहा लोकं एकदा ह्या गालाला आणि एकदा त्या गालाला हात लावत असतात. एका गृहस्थांना मी एकदा विचारलं की असं लोकं का करतात? तर ते म्हणाले की स्वतः केलेल्या पापांची शिक्षा म्हणून ते स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असतात. पण एकंदरीत ह्या लोकांच्या स्वतःला मारून घेतलेल्या थोबाडीत, मवाळंच असतात असं दिसून येतं. आणि ह्यांचा परमार्थ फक्त स्वतःच्या पापांचं प्रक्षालन करण्याइतपतच स्वार्थी असल्याचं पाहून आम्हालाही बरं वाटतं. न जाणो आमची पापं कळलीच कुणाला तर आम्हालाही थोबाडीत मारायचे. पण ह्या संधीचा वापर करून काही चांगल्या गालांनाही हात लावून घेता येतील असा एक पापी विचार आमच्या मनात येऊन जातो, पण तो आम्ही तूर्तास बाजूला सारून साईबाबांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आता प्रथम बायकांचा विचार करू (आमचा सगळा जन्म हेच करण्यात गेला. असो). बायकांची वर्गवारी आम्ही नेहमी दोनंच वर्गात करतो. कोण स्त्री कोणत्या वर्गात आहे हे ठरवणाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक वयावर आणि नजरेवर अवलंबून आहे. म्हाताऱ्या वर्गातल्या बायका मनापासून देवभक्त वगैरे असल्याच्या भासतात. तरुण वर्गातल्या स्त्रिया मात्र कॅमेरा कॉन्शस वाटतात.

म्हणजे बघा, आपण समजा रस्त्यावरून चालतोय. आपल्याला कुणीच बघत नसेल (आम्हाला कुणीच बघत नाही म्हणून आम्हाला हा अनुभव रोजचाच आहे) तर आपण आरामात चालतो. आता समजा आपण अमिताभ आहोत (समजायला काय जातंय? समजा हो न लाजता) आणि आजूबाजूची तमाम जनता आपल्याला बघत आहेत तर आपण कसे कॉन्शस होऊ? तशा तरुण वर्गातल्या मुली कॉन्शस झालेल्या दिसतात. म्हणजे देवाची प्रार्थना तर करायचेय, पण कुणीतरी आपल्याला बघतंय ह्याचं टेन्शन, तिकडे पण बघावंसं वाटतंय, पण देवाकडे बघणं ही प्रायॉरिटी आहे, मग ती सोडून इकडे तिकडे बघायचं तरी कसं असले भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. आता हा पक्का नियम आहे. कुणी भगिनी (ही आमची फॅशन बरं का, सगळ्या बायकांना आम्ही भगिनीच संबोधतो, बायको सोडून) म्हणतील की आम्ही त्यातल्या नाही. आम्हाला मान्य आहे. कारण नियम हे अपवादांनीच सिद्ध होत असतात.

आता पुरुषांकडे वळू. तिथे वर्गवारीचा प्रश्नच येत नाही. पुरूष हा सगळा एकंच वर्ग आहे. त्यात तरुण, म्हातारा, विवाहित, अविवाहित असे भेद करता येत नाहीत. कारण पुरूष कोणताही असला तरी देवाबरोच आजूबाजूची सौंदर्यस्थळं बघण्याचं काम यथास्थित पार पाडण्याची जबाबदारी देवानंच त्यांचा रुंद (पुरुषांचे खांदे नेहमी रुंदच असतात अगदी आमच्यासारख्या चिरगूट पुरुषांचे देखील) खांद्यावर टाकलेय असा त्याचा समज असतो. आपली जबाबदारी ते पार पाडत असतात.

हे सगळे विचार चालू असताना, आरती कधी संपून जाते ते कळतच नाही. आता देवापुढे जाऊन नतमस्तक होण्यासाठी चढाओढ लागते. एक कुणी गुडघ्यावर बसून वाकून देवाला नमस्कार करतो. आणि मागचे सगळे त्याचा ऍक्शन रिप्ले करतात. आम्ही आपले लांबून मजा बघत असतो. तेवढ्यात तरुण गटातील एक मुलगी (घट्ट जीन्स घातलेली हे वेगळं सांगायची गरज नाहीये पण सांगतो तरीही) गुडघ्यावर बसते आणि वाकते. देवाकडे बघायचं सोडून पुरूष वर्गातले सगळे तिच्याकडे पाहतात. आणि विशेष नमूद करायचा मुद्दा असा की पुरूष वर्गात असूनही इतर पुरूष काय बघत आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही इतर पुरुषांच्या चेहऱ्याकडे बघत असल्याने मुळात जी बघायची गोष्ट आहे ती आमची नीटशी बघून होत नाही. एक पाप कमी केल्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो.

पाठून कुणीतरी आमच्या नावाने खेकसतं. एकंदरीत आवाजावरून ही आमची मुलूखमैदान आहे हे आम्ही ओळखतो. वाकलेलं सौंदर्यस्थळ बघणाऱ्या पुरूष वर्गावरून आणि प्रत्यक्ष त्या सौंदर्यस्थळावरून नजर फिरवत आम्ही आमच्या मुलूखमैदान तोफेकडे बघतो. चला हो असं ती पुन्हा खेकसते आम्ही त्वरेने आज्ञेचं पालन करतो आणि देवळातून बाहेर पडतो.

आतमध्ये अध्यात्माला भरतं आलेलं असतं आणि साईबाबांची मूर्ती नेहमीसारखीच हसरी असते.

.

Monday, October 13, 2008

बाबू ते बांबू

राम राम, नमस्कार, शब्बा खैर....

तिच्यायला, शब्बा खैर शेवटी लिहायचं असतं नाही का? हिंदी किंवा उर्दू म्हटलं की आमची गोची ठरलेली. ऐन वेळी नेमका शब्द आठवत नाही. आणि वेळ टळून गेली की दहा शब्द आठवतात. अर्थात, मराठी सोडली तर तशी दुसरी कोणतीच भाषा आम्हाला नीट येत नाही आणि इंग्रजीतर अजिबातच नाही, हे आम्ही अगदी खाजगी वर्तुळात मान्य करतो. पण आज आम्ही हा ब्लॉग लिहायला घेतलाय आणि तो समस्त जनता वाचणार. झालंच तर गेलाबाजार त्याच्यावर चर्चा करणार. आणि समस्त समुदायाला समजणार की आमची इंग्रजी तितकीशी चांगली नाही. म्हणूनच ते जाहीरपणे मान्य करायचं आम्ही टाळतोय.

असो, मुद्दा असा होता की उर्दूमध्ये नमस्कार कसा करावा? ते आता आठवत नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला सलामे वालिकुम करतो आणि तुम्ही आम्हाला वालिकुमे सलाम म्हणा म्हणजे आम्ही पुढे लिहायला मोकळे.

बरेच दिवस आम्ही मराठी ब्लॉग विश्वावर विविध विषयांवरचे ब्लॉग्ज वाचतो आहोत. चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की "आम्ही" हा उल्लेख अनेकवचनी नसून (स्वतःप्रती) आदरार्थी आहे. तर वेगवेगळे ब्लॉग्ज आहेत. काही बरे आहेत, काही चांगले आहेत तर काही अगदीच टुकार आहेत. काही विनोदी आहेत म्हणून हसायला येतं काही "विनोदी" लिहितात म्हणून हसायला येतं आणि पुढेपुढे हे का लिहितात असं वाटून रडायलाही येतं. काही डायऱ्या (डायरिया हा डायऱ्या चा हिंदी उच्चार होऊ शकतो का हो? ) काही असंच आपलं कलात्मक वगैरे.

कलात्मक म्हणजे तर गंमतच आहे. ते मॉडर्न आर्ट का काय म्हणतात ना ते तसं. म्हणजे मेलेल्या घुशीच्या फाटलेल्या पोटातून बाहेर आलेल्या फाटलेल्या आतड्यातून वळवळ करणारी माणसं बाहेर येतात अशा टाईपची जी चित्र असतात ना तशी. नक्की काय ते कळतंच नाही. घुशीचं चित्र आहे की माणसाचं आहे? पोटातली ती माणसंच का? मेलेली ती घूसच का? कारण मॉडर्न आर्टमध्ये तो हत्ती, गेंडा, जिराफ, अमिबा वगैरे काहीही असू शकतो.

तर हे असे सगळे ब्लॉग्ज आहेत. काही भविष्याचे वगैरेही आहेत. काही बातम्यांचे वगैरे.

पण झणझणीत ठसका लागावा अगदी मामलेदारच्या मिसळीसारखा असं काही नाही वाचायला मिळालं बुवा. इथे सगळे बाबू लोकं. असं लिहितील की माणूस उकिडवा बसला होता, त्याच्या हातात वर्तमानपत्र होतं, चित्रविचित्र आवाज येत होते, सकाळची वेळ होती, आकाशात हिरवे, पिवळे ढग जमा झाले होते, ते दृश्य बघून कसंसंच वाटत होतं, मनाच्या आभाळावर दुर्गंधीचे ढग मळभ आणीत होते. असं सगळं आजूबाजूचं लिहितील पण एका वाक्यात लिहिणार नाहीत की तो माणूस संडास करून घाण करीत होता.

असं लिहिणारं कुणीतरी आम्ही बरेच दिवस शोधत राहिलो. कुणीच भेटेना. तेव्हा म्हटलं ह्या बाबू ब्लॉगांमध्ये आपला एक बांबू ब्लॉग सुरू करावा. निदान घरी निघणारा राग सगळा ह्या ब्लॉगवर निघेल आणि जेणेकरून आयुष्य अधिक सुखा समाधानाने जगता येईल.

बघूया काय होतं ते. आमचा बांबू ब्लॉगचा पण पूर्ण होतो की आम्हीही साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याप्रमाणे बाबू ब्लॉग लिहितो ते.

.